राज्यसभेत मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून फाडाफाड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन संसदेत गुरुवारीही प्रचंड गदारोळ उडाला आहे. त्यामुळे कामकाज किमान दोनवेळा स्थगित करावे लागले. राज्यसभेत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वक्तव्य करीत असताना तृणमूल काँगेसच्या सदस्याने त्यांच्या हातातील कागद हिसकावून घेतले आणि फाडून टाकले. ही कृती असभ्य आणि बेजबाबदार असल्याची टीका भाजपने केली. तसेच एका वृत्तसमूहावर पडलेल्या प्राप्तीकर धाडीचा मुद्दाही गाजला.
राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरुन भाजप आणि तृणमूल सदस्यांमध्ये प्रचंड वादंग माजले. दोन्ही पक्षांचे सदस्य परस्परांना भिडण्याच्या बेतात होते. तत्पूर्वी तृणमूल सदस्य शंतनू सेन यांनी मंत्री वैष्णव यांच्या जवळ जाऊन घोषणाबाजी केली. त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले. त्यानंतर भाजप सदस्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांसमोर आल्यानंतर सभाध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. लोकसभेतही मोठाच गोंधळ घातला गेला.
राज्यसभा 3 वेळा स्थगित
सकाळी 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्वरित गोंधळ आणि घोषणाबाजीला प्रारंभ झाला. यात काँगेस आणि तृणमूल काँगेसचे सदस्य आघाडीवर होते. त्यामुळे कामकाज 1 तासासाठी स्थगित करण्यात आले. नंतर ते याच कारणास्तव पुन्हा दुपारी 3 पर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर कागद फाडण्याचा प्रकार घडल्याने ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
पेगॅसस प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी राज्यसभेत केली. ही हेरगिरी सरकारनेच केली असून हा घटनात्मक मूलभूत अधिकारांचा भंग आहे. तसेच खासगीत्वाच्या अधिकारावर घाला घालण्यात आला आहे. केंद्र सरकारला लोकशाहीची चाड उरलेली नाही, असा आरोपही करण्यात आला.
धाडींचा मुद्दा
राज्यसभेत काँगेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी प्रसिद्ध वृत्तसमूह भास्कर व भारत समाचारवरील प्राप्तिकर विभागाच्या धाडीचा मुद्दा उपस्थित केला. सरकार आपल्या विरोधातील वृत्तपत्रांची गळचेपी करीत आहे. ही कृती लोकशाहीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. तथापि, प्राप्तिकर विभागाने केवळ वृत्तपत्रांना लक्ष्य बनविल्याचा आरोप चुकीचा आहे. या विभागाने भाजपचे आमदार अजयसिंग यांच्या घरांवरही धाडी घातल्या आहेत, ही बाब भाजप सदस्यांनी लक्षात आणून दिली.
- कामकाज स्थगितीचे सत्र सुरूच
- पेगॅससवरुन लोकसभा आणि राज्यसभा अनेकदा स्थगित
- राज्यसभेत भाजप आणि तृणमूल सदस्यांमध्ये वितंडवाद
- काही वृत्तसमूहांवरील प्राप्तिकर धाडीचा मुद्दाही गाजला