रशियात आगीदरम्यान ओपन हार्ट सर्जरी
रशियात पृथ्वीवरील देवाचे रुप म्हटले जाणाऱया डॉक्टरांनी कामाबाबत दाखविलेल्या निर्धाराचे पूर्ण जग कौतुक करत आहे. राजधानी मॉस्कोपासून दूर अंतरावरील ब्लागोवेशचेंस्क शहराच्या एका रुग्णालयाच्या वरच्या मजल्याला अचानक आग लागली, त्यादरम्यान डॉक्टरांचे एक पथक रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करत होते. आग फैलावत असतानाही डॉक्टरांनी सुरक्षितस्थळी पळून जाण्याऐवजी त्या रुग्णावरील शस्त्रक्रिया पूर्ण केली. रुग्णाला त्यावेळी तसेच सोडले असते किंवा हलविण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचा मृत्यू ओढवण्याची शक्यता होती.
8 डॉक्टर आणि परिचारिकांच्या एका पथकाने रुग्णाला सुरक्षितस्थळी हलविण्यापूर्वी दोन दोन तासांच्या अथक प्रयत्नांदम्यान ही शस्त्रक्रिया पूर्ण केली ओ. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी रुग्णाला तेथेच सोडून जाणे डॉक्टरांना सहज शक्य होते. पण त्यांनी माणसुकीचे दर्शन घडत रुग्णाचा जीव वाचवून शस्त्रक्रिया यशस्वीपर्ण पूर्ण केल्याचे रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले आहे.
दोन तासांनी आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक मेहनतीनंतर रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर फैलावलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. व्हायरल होत असलेल्या चित्रफितीत आगीची भीषणता दिसून येते. अग्निशमन दलाने शौर्य दाखवुन देत ही आग रुग्णालयाच्या अन्य भागांमध्ये फैलावण्यापासून रोखली आहे.
रुग्णाला सोडू शकत नव्हतो
कुठल्याही स्थितीत रुग्णाला वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनुसार हे काम केले आहे. हृदयावरील शस्त्रक्रिया असल्याने रुग्णाला तेथेच सोडून देणे शक्य नव्हते असे शस्त्रक्रिया करणारे सर्जन वॅलेन्टिन फिलाटोव्ह यांनी सांगितले आहे. छतावर आग लागल्यावर 128 लोकांना त्वरित रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले होते.
100 वर्षे जुने रुग्णालय
हे रुग्णालय 1907 साली निर्माण करण्यात आले होत. आगीने लाकडी छताला त्वरित स्वतःच्या भक्ष्यस्थानी घेतले होते. या दुर्घटनेत कुणीच जखमी झालेला नाही. स्थानिक क्षेत्रीय गव्हर्नर वासिली ओर्लोव यांनी अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे कौतुक केले आहे.