पहिल्या दिवशी 47 हजारांची मदत जमा
17 हजार प्रेक्षकांनी पाहिले दशावतारी नाटक
वार्ताहर / मालवण:
‘आई प्रतिष्ठान’ आणि ‘द इव्हेंट ब्लास्टर’ यांनी संयुक्तरित्या सुरू केलेल्या ‘पेटारो दशावताराचो’ या नव्या उपक्रमाला यू-टय़ूबवर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 15 जून रोजी यू-टय़ूबवर प्रसारित झालेले ‘चौरंगीनाथ’ हे दशावतारी नाटक पाच हजार प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिले. दिवसभरात 17 हजार प्रेक्षकांनी हे नाटक यू-टय़ूबवर पाहिले. प्रेक्षकांनी दशावतारी कलाकारांच्या मदतीसाठी गुगल पेद्वारे 47 हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याची माहिती कला दिग्दर्शक रुपेश नेवगी यांनी दिली. हा निधी जमा करून तो दशावतारी कलाकार मंडळींपर्यंत पोहोचविला जाणार आहे.
आपली कोकणी संस्कृती जपण्यासाठी आणि लाल मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करण्यासाठी कोकणातली हौशी कलाकार मंडळी आवर्जून दशावतारी नाटकांमध्ये सहभाग घेतात. गावोगावी जाऊन नाटकांचे प्रयोग करतात. विशेष म्हणजे गावपाडय़ात लोकप्रिय ठरलेला हा कलाप्रकार सातासमुद्रापार पोहोचला आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी दिवाळीनंतर भरणाऱया मालवणी महोत्सवांमध्ये विविध दशावतारी कंपन्यांना आमंत्रित केले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे या दशावतार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दशावतारी कलाकारांच्या उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. गावात जत्रा नाहीत, त्यामुळे नाटकेही नाहीत. परिणामी या कलाकारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. परंतु या कलाकारांच्या मदतीसाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
दशावतारी कलावंतांना मदतीचे आवाहन
15 जूनपासून यू-टय़ूबवर ‘पेटारो दशावताराचो’ या उपक्रमांतर्गत काही निवडक दशावतारी नाटय़प्रयोग प्रदर्शित केले जात आहेत. सोबतच या दशावतारी मंडळींना मदतीचा हात मिळावा, यासाठी नाटकाच्या आयोजकांनी प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी या नाटकाच्या यू-टय़ूब पेजसोबतच ‘गुगल पे’चा क्यूआर कोड दिला आहे. ज्या प्रेक्षकांना या कलाकारांना मदत करण्याची इच्छा आहे, त्यांना ‘गुगल पे’च्या माध्यमातून आर्थिक मदत करता येणार आहे, असे रुपेश नेवगी यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही रक्कम थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार आहे. जिल्हय़ात सुमारे 4500 दशावतार कलाकार मंडळी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळय़ा कलाकारांपर्यंत समसमान प्रमाणात ही मदत पोहोचविली जाणार आहे. विशेष म्हणजे या नाटकातील सर्व कलाकारांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून या नाटकांचे चित्रीकरण केले आहे.