जुगारविषयक धोरणाच्या उल्लंघनाचा ठपका, मात्र ऍपचे लगेच पुनरागमन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’चे मुख्य ऍप आणि ‘पेटीएम फर्स्ट गेम्स’ यांना गुरुवारी ‘गुगल’कडून ‘प्ले स्टोअर’मधून काढून टाकण्यात आल्याने खळबळ माजली. ‘पेटीएम’ने सुरू केलेल्या ‘फँटसी क्रिकेट लीग’मुळे जुगारविषयक धोरणाचा भंग होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्यावर ‘गुगल’कडून शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांचे परत ‘प्ले स्टोअर’मध्ये आगमन होऊन तसे ‘पेटीएम’कडून जाहीरही करण्यात आले.
‘गुगल’ने भारतातील जुगार खेळण्याविषयीचे धोरण या विषयावर भूमिका स्पष्ट केल्यानंतर हा निर्णय समोर आला. त्यानंतर दोन्ही ऍप्स शोधण्याचा प्रयत्न प्ले स्टोअरवर करण्यात आला असता ते सापडत नसल्याचे दिसून आले. तथापि, ‘पेटीएम’चे ‘पेटीएम फॉर बिझिनेस’, ‘पेटीएम मॉल’ आणि ‘पेटीएम मनी’ हे अन्य ऍप्स मात्र दिसत होते.
मात्र जुगारविषयक धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन डच्चू देण्यात आल्यानंतर ‘पेटीएम’ शुक्रवारी संध्याकाळी गुगल प्ले स्टोअरवर परत आले. ‘आणि आम्ही परत आलो आहोत’, असे ‘पेटीएम’ने ट्विट करून जाहीर केले. ग्राहकांना त्यांच्या क्रिकेटची हौस भागविता यावी आणि कॅशबॅक मिळविता यावे यासाठी आम्ही आमच्या ऍपवर नुकतीच ‘पेटीएम क्रिकेट लीग’ सुरू केली होती. याअंतर्गत प्रत्येक व्यवहारानंतर खेळाडूंचे स्टिकर्स मिळण्याची सोय करण्यात आली होती. ते गोळा केल्यावर पेटीएम कॅशबॅक प्राप्त होत होते, असे ‘पेटीएम’कडून सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी ‘गुगल’कडून निवेदन प्राप्त झाले. जुगारविषयक प्ले स्टोअर धोरणांचे उल्लंघन झाले असल्याने ते ऍप निलंबित करत आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार ‘पेटीएम अँड्रॉईड ऍप’ ‘गुगल प्ले स्टोअर’मधून हटविण्यात आले आणि नवीन डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी तात्पुरते अनुपलब्ध झाले, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.