वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठा आयपीओ पेटीएमच्या इशुला सोमवारी फारसा चांगला प्रतिसाद लाभला नसल्याची बाब समोर आली आहे. पहिल्या दिवशी 4 वाजेपर्यंत इशु 17 टक्के इतकाच भरला होता.
पेटीएमने एकूण 4.38 कोटी समभाग बाजारात जारी केले आहेत. यातुलनेत 81.96 लाख समभागांसाठी अर्ज प्राप्त झाला. कंपनीने आपल्या आयपीओची किंमत 2080 ते 2150 रुपये इतकी प्रति समभाग ठेवली होती. कंपनी या आयपीओतून 18 हजार 300 कोटी रुपये उभारणार आहे. यापैकी 8 हजार 235 कोटी रुपये रक्कम गुंतवणूकदारांनी 3 नोव्हेंबरला जमवली होती. या गुंतवणूकदारांमध्ये बिर्ला म्युच्युअल फंड, ब्लॅकरॉक, जीआयसी आणि ब्ल्यूचीप फंड यांचा समावेश होता.
ऑफर फॉर सेलअंतर्गत कंपनी 18 हजार 300 कोटी रुपयांपैकी 10 हजार कोटी रुपये ऑफर फॉर सेलअंतर्गत उभी करणार आहे. म्हणजेच कंपनीतील सध्याचे भागीदार आपली हिस्सेदारी विकतील. पेटीएम ही सततपणे तोटय़ात चाललेली कंपनी आहे. मागच्या वर्षी या कंपनीला 1700 कोटींचा तोटा झाला होता.
ब्लॅकरॉकची 1 हजार कोटीची गुंतवणूक
दरम्यान ब्लॅकरॉक कंपनीने 1 हजार 45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कॅनडा पेन्शन फंडने 938 कोटी रुपयांची तर जीआयसीने 533 कोटी रुपये गुंतवले आहेत. 18 हजार 300 कोटी रुपयांपैकी 45 टक्के रक्कम आधीच पेटीएमला प्राप्त झाली आहे. कंपनीचे मूल्य 1.48 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते.