माजी संचालकांकडून आयपीओ थांबविण्याची मागणी- पेटीएमने आरोप फेटाळले
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील विविध कंपन्या आपले आयपीओ बाजारात आणत आहेत. यामध्ये झोमॅटो पाठोपाठ पेटीएम कंपनीच्या आयपीओवर अधिकची चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. परंतु सध्या याच पेटीएम आयपीओवर संकटाचे ढग निर्माण होत आहेत. कारण माजी संचालकांनी या आयपीओला विरोध केला आहे. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कंपनीमध्ये 27,500 डॉलरची गुंतवणूक केली होती. परंतु यातील एकही समभाग दिलेला नाही अशी माहिती आहे.
वय वर्ष 71 असणारे अशोक कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार ते कंपनीचे सह संस्थापक म्हणून कार्यरत राहिले होते. त्यांनी जवळपास 20 वर्षापूर्वी 27,500 डॉलर गुंतवणूक केली होती. हाच आकडा आजच्या तारखेला रुपयामध्ये 20.35 लाख रुपये झाला आहे. याबाबत सक्सेना यांनी दिल्ली पोलीसात तक्रार दाखल केली आहे. या घडामोडीनंतर पेटीएमने दिल्ली पोलीसांना दिलेल्या जबाबामध्ये सक्सेना आम्हाला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. परंतु सक्सेना यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
जुलैमध्ये डीआरएचपीचा प्रस्ताव
पेटीएमने आयपीओला मंजुरी देण्यासाठी जुलैमध्ये सेबीजवळ रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) चा सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये ही माहिती दिली होती. आता मंजुरीची वाट पाहिली जात आहे.
सेबीकडून मंजुरीला उशीर होण्याचे संकेत
यावेळी एका गुंतवणूक फर्मच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे, की सेबी या प्रकरणात आयपीओला मंजुरी देण्यास उशीर करणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे आयपीओला उशीर होण्याची दाट शक्यता आहे.