तामिळनाडू, केरळ, पंजाबमध्ये पेट्रोलची ‘शंभरी’पार झेप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेले दोन दिवस पेट्रोलचे दर स्थिर राहिल्यानंतर शुक्रवार 2 जुलै रोजी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नसला तरी पेट्रोलच्या किंमतीत 35 ते 40 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात इंधनाच्या किंमतीमध्ये झालेली ही 33 वी वाढ आहे. नव्या दरवाढीमुळे तामिळनाडूसह केरळ आणि पंजाब या राज्यांमधील बहुतांश ठिकाणी पेट्रोल ‘शंभरीपार’ पोहोचले आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 100.13 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 93.72 रुपयांवर पोहोचले आहेत. एकंदर पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल दराचीही ‘शतका’कडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नव्या इंधन दरवाढीमुळे देशातील बऱयाच शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती नवीन विक्रमांच्या उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी किंमतीत वाढ झाल्याने मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 105 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 105.24 रुपये झाली आहे. तर डिझेलचा दरही शंभरीकडे वाटचाल करत असून तो आता प्रतिलिटर 96.72 रुपये झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 99.16 रुपये आणि डिझेल 89.18 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 99.04 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे डिझेलची किंमत प्रतिलिटर 92.03 रुपयांवर गेली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. शहरातील डिझेल दरानेदेखील 100 रुपयांचा आकडा गाठला आहे.
दोन महिन्यात 33 वेळा वाढ
पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीचा टप्पा 4 मेपासून सुरू झाला. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण 33 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 32 वेळा वाढ करण्यात आली. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोलपंपांवर विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. इंधन दरातील या भडक्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहेत.