इंधन दरात वाढीचे सत्र सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर शुक्रवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. पेट्रोल 26-27 पैसे प्रतिलिटर महागले आहे, तर डिझेलच्या दरात 26-30 पैसे वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे, तर डिझेलची किंमत 93 रुपयांवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उतारांमुळे भारतातही इंधन दरात वाढ होत असल्याचा दावा केला जात आहे.
पेट्रोलच्या किंमतीनंतर आता डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. नव्या वर्षात डिझेल 12 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे महागाईत पेट्रोल-डिझेलचा अधिक भडका उडणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील 135 जिल्हय़ांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये देशात सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तेथे पेट्रोलचा दर 105.80 रुपये आहे, तर डिझेल प्रतिलिटर 98.63 रुपये आहे.
मे महिन्यात पेट्रोल 4.09 रुपयांनी महाग
मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 वेळा वाढविण्यात आल्या. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 4 मेपासून सलग चार दिवस वाढ करण्यात आली होती. दिल्लीत मे महिन्यात पेट्रोल प्रतिलिटर 4.09 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेल महिन्याभरात 4.68 रुपयांनी वाढले आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे.