प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे काल शुक्रवारी राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. धरणे धरून मोदी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला. राजधानी पणजीत त्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला. आम्हाला ‘अच्छे दिन’ नको पूर्वीचेच दिन बरे होते, अशी मागणी करून इंधन दरवाढ मागे घ्यावी, असे सुनावले.
राजधानी पणजीतील नेवगी नगर येथील पेट्रोल पंपांवर हे आंदोलन झाले. मोदी सरकार जनतेला फसवत असून रु 35.63 प्रती लीटर असलेले पेट्रोल रु. 93.80 ला तर रु. 38.16 प्रती लीटर असलेले डिझेल रु. 91.50 ला विकले जात आहे.
काँग्रेस पक्षातर्फे देशभर हे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यातही आंदोलन झाले. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेचे कंबरडे मोडून टाकले आहे. हे सरकार असंवेदनशील असून कोरोना संकटकाळातही इंधन दरवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. इंधन दरवाढीच्या नावाखाली मोदी सरकार सामान्य जनतेला लुटत असून कोटय़वधीची माया गोळा करत आहे. पेट्रोल-डिझेल हे रु 36 व रु. 38 या दराने विकावे, अशी मागणी त्यांनी केली.
रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले की, जनतेला लुटणारे हे मोदींचे क्रूर सरकार असून सर्वसामान्य जनतेला या सरकारने संपवले आहे. इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी व ते पूर्वीच्या दराने मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. कोरोना संकटकाळातही मोदी सरकारने जनतेची कीव केली नाही. सातत्याने इंधन दरवाढ करून जनतेला छळले, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनातून केली. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली व इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदवला.