दीड वर्षात 44 लाखांची फसवणूक, 28 लाख रुपये जप्त, तरुणाला अटक, सीईएन विभागाची कारवाई : पेट्रोलपंप मालकांमध्ये खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
पेट्रोलपंपावर काम करणाऱया एका कामगाराने आपल्या मालकाला गंडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ दीड वर्षात 44 लाख रुपयांना फसविले आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली असून कामगाराला अटक करुन सीईएन विभागातील अधिकाऱयांनी 28 लाख रुपये जप्त केले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटक करुन 28 लाख रुपये रोकड जप्त केली आहे.
रोहित राजू बेळगुंदकर (वय 21, रा. नावगे क्रॉस) असे त्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी अशी प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. अशा प्रकरणांच्या तपासासाठी त्यांनी स्वतः पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
हुंचेनट्टी क्रॉसजवळील सोमनाथ पेट्रोलियमचे संचालक सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर विनाविलंब संशयिताला अटक करुन 28 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. फोन पेच्या माध्यमातून कामगाराने आपल्या मालकाची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार सप्टेंबर 2020 पासून आतापर्यंत रोहितने आपण काम करीत असलेल्या पेट्रोलपंप मालकाला 44 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. रोहित हा सोमनाथ पेट्रोलियममध्ये काम करतो. क्लार्क आणि कामगार म्हणून काम करताना अत्यंत व्यवस्थितपणे केवळ दीड वर्षांत त्याने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
फोनपेमधील रिफंड ऑप्शनचा दुरुपयोग करीत रोहितने मालकाची आर्थिक फसवणूक केली आहे. रोज जमा होणारी रक्कम फोन पेमध्ये जमा होणाऱया पैशांतून हळूहळू त्याने मोठय़ा प्रमाणात रोकड उचलली आहे. आपल्या फोन पेमधून मालकाच्या खात्यात रक्कम जमा करायची. हिशेबासाठी जमा झाली की रिफंड ऑप्शनचा वापर करीत ती रक्कम तो पुन्हा आपल्या खात्यात वळवायचा.
ही लूट पेट्रोलपंप मालकाच्या लक्षात येताच त्याने सीईएन विभागाशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी रोहितला अटक करुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपली हात चलाखीची कबुली दिली. त्याच्या जवळून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सावधगिरी बाळगण्याची गरज सध्या ऑनलाईन आणि डिजीटलचा जमाना आहे. आर्थिक व्यवहारही ऑनलाईनच्या माध्यमातूनच होतो. एक लिटर दूध खरेदी करणाराही फोन पे, गुगल पे वरुन पैसे देतो. पेट्रोलपंपावरही ही सोय असते. गुगल पेमध्ये असलेल्या रिफंड ऑप्शनचा दुरूपयोग करुन मालकांना गंडविण्याची विद्या अनेक कामगारांनी आत्मसात केली आहे. चार वर्षांपूर्वी टिळकवाडी येथील दोन पेट्रोलपंपांमध्ये असेच प्रकार उघडकीस आले होते. एका प्रकरणात पोलिसांत फिर्याद दाखल झाली. दुसरे प्रकरण त्यावेळच्या पोलीस अधिकाऱयांनी दाबले होते. केवळ दीड वर्षांत कामगाराने 44 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार लक्षात घेता अशा व्यवहारात प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.