सीमाहद्दीवर पेट्रोल दर 10.80 रुपयांनी कमी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात पेट्रोल किंमतीत मोठी तफावत दिसून येते. साधारण कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात 10 रुपये 80 पैसे पेट्रोलचा दर अधिक आहे. त्यामुळे सीमाहद्दीवरील पेट्रोलपंपावर महाराष्ट्रातील वाहनधारकांची संख्या वाढत आहे.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली. विशेषतः कामगार, नोकरदारवर्गाचे बजेट कोलमडले आहे. त्यातच कर्नाटक आणि महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत तफावत असलेली पहायला मिळत आहे. सीमाहद्दीवरील पेट्रोलपंपावर महाराष्ट्रापेक्षा 10 रुपये 80 पैशांनी पेट्रोल कमी दराने मिळत असल्याने वाहनधारक कर्नाटकात पेट्रोल भरायला पसंती देत आहेत. त्यामुळे काही पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
पश्चिम भागातील उचगाव, बेळगुंदी, अलतगा क्रॉस, दड्डी आदी भागात सीमाहद्दीवर असलेल्या पेट्रोलपंपावर गर्दी वाढत आहे. साधारण प्रतिलिटर मागे 10 रुपये बचत होत असल्याने महाराष्ट्रातील वाहनधारक कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या पेट्रोलपंपांवर इंधन भरताना दिसत आहेत. विशेषतः चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्मयातील वाहनधारकांची सीमाहद्दीवरील पेट्रोलपंपांवर गर्दी दिसत आहेत. कर्नाटकात पेट्रोलचा दर कमी असल्याने काहीजण महाराष्ट्रातून येऊन एकावेळी जास्त पेट्रोल घेऊन जाताना दिसत आहेत.