12 दिवसांत इंधनदरात दहाव्यांदा वाढ : मुंबईत सर्वाधिक 85-85 पैशांनी वाढ
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही दहावी वाढ असून एकंदर दोन्ही इंधनांच्या किंमती प्रतिलिटर 7 रुपये 20 पैशांनी वाढल्या आहेत. मुंबईत शनिवारी सर्वाधिक प्रतिलिटर 85-85 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. येथे पेट्रोलची नवीन किंमत 117.57 रुपये आणि डिझेलची नवीन किंमत 101.79 रुपये झाली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102.61 रुपयांवर पोहोचला असून डिझेलची विक्री 93.87 रुपयांनी केली जात आहे. तसेच चेन्नईमध्ये दर 108.21 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात पेट्रोल 84 पैशांनी वाढल्यामुळे 112.19 रुपये झाले असून डिझेल दर 80 पैशांच्या वाढीसह 97.02 रुपये इतका झाला आहे. 22 मार्चपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असून आतापर्यंत प्रतिलिटर सात रुपयांहून अधिक दरवाढ झाल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे.
दररोज वाढणाऱया पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे वाहनधारकांच्या खिशाला चाप बसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 100 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने करकपात करत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये कपात केली होती. मात्र, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठवडय़ापासून पुन्हा दरवाढीचा चटका सहन करावा लागत आहे.