बुधवारी पेट्रोल 97.45 तर डिझेल 90.45 रुपयांनी विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
आधीच कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र पेट्रोल व डिझेलची दरवाढ काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज काही पैशांनी इंधनाच्या दरात वाढ होतच आहे. यामुळे पेट्रोलची दरवाढ अशीच राहिली तर काही दिवसात पेट्रोलचा दर शंभरी पार होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याने त्याचा फटका देशभरातील इंधनाच्या किरकोळ विक्रीवर होत आहे. एप्रिल महिन्यात देशातील राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीला सुरुवात झाली. तेव्हापासून दररोज काही पैशांनी पेट्रोल व डिझेलची दरवाढ सुरूच आहे. यामुळे प्रतिलिटर 80 रुपये असणारे पेट्रोल आता 97 रुपयांवर पोहोचले आहे.
बुधवारी बेळगाव शहरात प्रतिलिटर पेट्रोल 97.45 रुपयांना विक्री केले जात होते. तर डिझेल प्रतिलिटर 90.45 रुपयांनी विक्री होत होते. पहिल्यांदाच इंधनाचा इतका दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. आज प्रत्येकाच्या घरात दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची आवश्यकता भासत असते. यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने इंधनाचा दर नियंत्रणात आणावा, अशी मागणी होत आहे.