पेट्रोल 26, डिझेल 25 पैशांनी महागले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. यापूर्वीची इंधन दरवाढ 7 डिसेंबरला झाली होती. पण त्यानंतर मात्र दररोज जाहीर होणारी वाढ पेट्रोलियम कंपन्यांनी थांबवली होती. बुधवारी तब्बल महिनाभरानंतर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 26 पैशांनी आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये डिझेलचा दर आता 80 रुपये 78 पैसे इतका झाला आहे. तर पेट्रोलचा दर 90 रुपये 60 पैसे इतका झाला. दिल्लीत पेट्रोलचा दर 83 रुपये 97 पैसे आणि डिझेलचा दर 74 रुपये 12 पैसे इतका झाला आहे. मे 2020 पासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 14 रुपये 28 पैसे आणि डिझेलच्या दरात 11 रुपये 83 पैसे वाढ झाली आहे. केंद्राने मार्च आणि मे 2020 या दोन टप्प्यांमध्ये पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे.