ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्यांत पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. सतत वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होत आहे. जेव्हो पेट्रोल पंपावर बिल द्याल तेव्हा तुम्हाला मोदी सरकारने महागाईमध्ये किती विकास केला आहे ते दिसेल. टॅक्स वसूलीच्या महामारीच्या लाटा येत-जात असतात अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे नागरिकर घरातच आहेत. यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. नागरिकांना पुन्हा रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत परंतु दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी इंधनदरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ताज्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोल 95.31 रुपये प्रति लीटर तर डिझेल 86.22 रुपये प्रति लीटर आहे. तेच मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.58 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर पुण्यात देखील पेट्रोल दराने शंभरी ओलांडली असून साधे पेट्रोल 101.18 रुपये, पॉवर 104.87 रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी पुणेकरांना 91.82 रुपये मोजावे लागत आहेत.