प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर जाणवू लागला आहे. पेट्रोल व डिझेलचे दरही यामुळे वाढले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्येकी दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारने वाढविलेल्या करामुळे ही दरवाढ झाली आहे.
बुधवारी बेळगाव शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.42 इतका होता. डिझेल 65.88 रुपयांना विक्री केले जात होते. सोमवारी पेट्रोलचा दर 71.85 रु. तर डिझेलचा दर 64.34 रु. इतका होता. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे 1.57 व 1.55 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका साहजीकच सर्वसामान्य वाहनचालकांना बसू लागला आहे.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांची वर्दळ मंदावलेली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलची मागणी अत्यंत कमी झाली आहे. परंतु बुधवारपासून केंद्र सरकारने माल वाहतूक करण्यास परवानगी दिल्यामुळे मालवाहतूक करणाऱया वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्यांनाही या इंधन दरवाढीचा फटका बसणार आहे..