मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती – हुबळी विमानतळावर पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास पोटनिवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलवरील स्थानिक कर कमी करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. हानगल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जाण्यासाठी रविवारी ते बेंगळूरहून हुबळी विमानतळावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, पोटनिवडणुकीनंतर राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. आर्थिक परिस्थिती सुधारली असल्यास पेट्रोल-डिझेलवरील स्थानिक कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या कारणामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. या महिन्याच्या 30 तारखेनंतर आर्थिक परिस्थितीची पाहणी करून सर्वांशी चर्चा केल्यानंतर कर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या कार्यकाळात हानगल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 2,400 कोटी रुपये दिल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. मात्र, ही रक्कम कशासाठी दिली आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले. रविवारपासून हानगल पोटनिवडणुकीचा प्रचार हाती घेत आहे. सिंदगी आणि हानगल या दोन्ही मतदासंघांसाठी अधिक वेळ देऊन प्रचार करणार आहे. तसेच दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवारांचा विजय होणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केला आहे.