शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी
प्रतिनिधी / सोलापूर
केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने दरवाढ करुन जनतेस लूटत आहे. या प्रश्नाकडे काँग्रेसने आंदोलन करून लक्ष दिले. त्याच प्रमाणे शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी सोलापूर शहर काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना महामारीने जनता त्रस्त असून या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजून पूर्वपदावर आले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत असताना अशा कठीण प्रसंगी केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किंमतीत दरवाढ करून आणखी एक संकट लोकांवर लादले. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड हाल होत आहेत, असे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सांगितले.
या आंदोलनात महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी महापौर आरिफ शेख, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.