मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने मुंबईमध्ये पेट्रोल ‘शंभरी’पार गेले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. डिझेलच्या दरात 28 पैसे तर पेट्रोलच्या दरात 26 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीमुळे आता मुंबई हे पेट्रोल दरवाढीची शंभरी गाठणारे देशातील पहिले महानगर ठरले आहे. आता मुंबईत पेट्रोल 100.19 रुपये तर डिझेल 92.17 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
मुंबईप्रमाणेच इतर महानगरांचा विचार करता दिल्लीत डिझेल दर 84.89 रुपये तर पेट्रोल 93.94 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल 93.97 रुपये तर डिझेल 87.74 रुपये दराने विक्री केले जात आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात दररोज सकाळी 6 वाजता बदल होतो. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज डय़ुटी, डीलर कमिशन आणि इतर खर्च एकत्र करून वेगवेगळय़ा राज्यांमध्ये वेगवेगळे दर आकारले जातात. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंधन दरात वाढ होऊ लागली असून गेल्या पंधरा दिवसात सातत्याने हळूहळू वाढ होत असलेली दिसत आहे. इंधन दरात वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होऊन महागाईचा भडका उडत आहे. या सर्वांचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होताना दिसत आहे.