ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरच्या दारातही 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता 14 किलोचा गॅस सिलिंडर 949.50 रुपयांवर पोहचला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडर महागला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर इंधन दरवाढीची शक्यता वर्तवण्यात आली होती. मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलची दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केली. मुंबईत आता 14 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये तर लखनऊमध्ये 987.50 रुपये मोजावे लागणार आहेत. पाटणामध्ये गॅस सिलिंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती 130 डॉलर प्रति बॅरल वरून 110 डॉलर प्रति बॅरल झाल्या असल्या तरीदेखील सर्वसामान्यांना याचा कोणताही फायदा झालेला नाही. हे या दरवाढीवरून दिसून येते. पेट्रोलियम कंपन्यांनीही पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लिटरमागे दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपयांवरून 96.21 रुपयांवर तर डिझेल 86.67 रुपयांवरून 87.47 रुपये प्रति लिटर झाले आहे.