नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या सलग दोन दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात झाली आहे. नववर्षात यापूर्वी 27 फेब्रुवारीपर्यंत दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर जवळपास पंचवीस दिवस भाववाढ स्थिरावली होती. मात्र, आता कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने गुरुवारी पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 20 पैशांनी घट झाली आहे. सलग दोन दिवस इंधन दरात घट झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने त्याचा प्रथमच ग्राहकांना थेट फायदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात 18 तर डिझेलमध्ये 17 पैसे प्रतिलिटरने घट केली होती.