सहा राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल दर ‘शंभरी’पार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केल्यामुळे सलग दुसऱया दिवशी देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल 23 पैशांनी महाग झाले आहे. इंधनाच्या भडक्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि लडाख या सहा राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे. 4 मे नंतर आतापर्यंत म्हणजेच 12 जूनपर्यंत 23 वेळा इंधन किंमतीत वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मे महिन्याच्या प्रारंभापासून पेट्रोल प्रतिलिटर 5.45 रुपये आणि डिझेल 6.02 रुपयांनी महागले आहे.
तेल किंमतीत बदल झाल्यानंतर शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.12 रुपये प्रतिलिटर झाली असून डिझेल दर 86.98 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 102.30 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलची किंमत 29 पैसे प्रतिलिटर तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 28 पैसे वाढ केली होती.