नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच दिवसांनंतर पुन्हा काहीशी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर 22 पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर 23 पैसे प्रतिलीटर कमी करण्यात आला. 24 मार्च या दिवशी सहा महिन्यांनंतर प्रथम या दोन्ही जीवनावश्यक वस्तूंचे दर घटविण्यात आले होते. 25 मार्चला पुन्हा दरांमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यामुळे या तीन कपातींमुळे पेट्रोलचे दर प्रतीलीटर 61 पैशांनी कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.