सलग दुसऱया दिवशी प्रतिलिटर 25-26 पैशांनी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल-डिझेलच्या दरात शनिवारी सलग दुसऱया दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे दिल्लीतील पेट्रोलच्या दराने नवी उंची गाठली आहे. डिझेल देखील 76 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. मुंबईतही डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
देशभर पेट्रोल, डिझेलचे दर आता बेलगाम झाल्याचे दिसत आहेत. 6 जानेवारी 2021 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर पडत आहे. पुढील दिवसात दरांत दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असली तरी सध्या वाढलेल्या प्रचंड दरांमुळे वाहनधारकांमध्ये संतापाची भावना वाढत चालली आहे.
नववर्षात साधारण 2 रुपयांनी महाग
जानेवारी महिन्यात पेट्रोलच्या दरात आतापर्यंत प्रतिलिटर 1.99 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारीला दिल्लीत 83.71 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आता 85.70 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर डिझेलचा दर आतापर्यंत 2.01 रुपयांनी महागले आहे. 1 जानेवारी रोजी दिल्लीत डिझेलचे दर 73.87 रुपये होते. हा दर आता 75.88 रुपये झाला आहे.