नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होत असलेली दरवाढ थांबायचे नाव घेत नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱया दिवशी म्हणजेच शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35-35 पैसे वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.49 रुपये आणि डिझेलची किंमत 94.22 रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात 16 दिवसात 13 वेळा पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डिझेल 4.35 रुपयांनी महाग झाले आहे. तसेच जानेवारीपासूनच्या 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल 21.52 रुपयांनी आणि डिझेल 21.10 रुपयांनी महाग झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाची किंमत 84 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून सातत्याने इंधन दरवाढ केली जात आहे. सध्या देशातील 29 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर पार केले आहे. तसेच मध्यप्रदेश, छत्तिसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.