केएलई रोड उद्यमबाग येथील प्रीपेड कार्डच्या माध्यमातून भरता येणार पेट्रोल-डिझेल
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथील भारत पेट्रोलियम येथे ग्राहकांना आता अधिक सुलभरित्या पेट्रोल व डिझेल वाहनांमध्ये भरता येणार आहे. केएलइ रोड कॉर्नर उद्यमबाग येथील भारत पेट्रोल पंपावर प्रीपेड पद्धतीने पेट्रोल, डिझेल भरता येणार आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
केएलई रोड कॉर्नर उद्यमबाग येथील देसाई पेट्रोलियम येथे नव्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मोठय़ा महानगरानंतर बेळगावमध्ये प्रथमच अशा प्रकारची सेवा पेट्रोल पंपावर उपलब्ध होणार आहे. पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकांना तात्काळ डिस्काउंटही मिळणार आहे. ‘यू फील’ च्या माध्यमातून ग्राहकांना प्रीपेड इंधन भरता येणार आहे. प्रत्येक शंभर रुपयाचे इंधन भरल्यानंतर ग्राहकांना 0. 75 पैसे डिस्काउंट लगेचच ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. तर स्मार्ट कार्डच्या माध्यमातून आपल्याला हवे त्या रकमेचे पेट्रोल अथवा डिझेल ग्राहकांना वाहनात भरता येणार आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून इंधन भरल्यानंतर प्रत्येक शंभर रुपयाच्या इंधनाला 0.75 डिस्काउंट ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
ही सेवा देणारे देसाई पेट्रोलियम हे बेळगावमधील प्रथमच पेट्रोलपंप असणार आहे. स्मार्ट फिलिटकार्ड हे देसाई पेट्रोलियम येथे उपलब्ध होणार आहे ज्याप्रकारे मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून आपण कोणतेही रिचार्ज अथवा बिल भरू शकतो त्याच प्रकारे या स्मार्ट कार्डमधून रक्कम वजा होणार आहे. तसेच ग्राहकांना डिस्काउंट त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. ड्रायव्हर तसेच क्लीनर यांना इन्शुरन्स उपलब्ध करून दिला जाणार आहे. या सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापक कुलदीप गुलाटी म्हणाले ग्राहकांना जागतिक स्तरावरील उत्तम सेवा देण्यासाठी भारत पेट्रोलियम तत्पर आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीपेड व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे घर बसल्या मालक आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ड्रायव्हरला पेट्रोल पंपावर पाठवून पेट्रोल भरू शकतात. यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असल्याने ग्राहकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य तसेच उद्योजक देसाई परिवारातील सदस्य उपस्थित होते.