प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुणास इस्लामपूर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडे १६४ ग्रॅमच्या कोकेन कॅप्सुल मिळून आल्या. त्या हस्तगत करून आरोपीस अटक करण्यात आली.
एडवर्ड जोसेफ इदेह ३५, मुळ रा.नायजेरिया, सध्या रा.बेंगलोर, असे आरोपीचे नाव आहे. येथील पोलीस निरीक्षकांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती मिळाली. रविवारी रात्री पोलीसांनी पेठनाका येथील न्यु मणिकंडन हॉटेल जवळ सापळा लावला. पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स बस क्रमांक के.ए.५१ ए जी १४५७ मधून एडर्वड हा उतरत होता. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या काळया रंगाच्या सॅकमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शाम्पूची ६५० मिली मापाची काळया रंगाची बाटली आढळून आली. त्यामध्ये कोकेन अंमली पदार्थाच्या १५ कॅप्सुल मिळून आल्या. हे कोकेन सुमारे १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे आहे. एडवर्ड इदेह विरुध्द एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद
करण्यात आला आहे. दि.२५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बेंगलोर प्रवास करीत ११ लाख रुपयांचे कोकेन घेवून जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे १०९ ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेवून जाताना पोलीसांच्या जाळयात सापडला आहे.