प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव येथे लाटवडे रोडवर राहत असलेला एक इसम कोरोना पॉझिटीव्ह आल्याने वडगाव शहरात खळबळ उडाली आहे. हा इसम शिये येथे नोकरीस असून त्याला त्रास होत असल्याने त्याने स्वतः स्वॅब देवून आला होता. यामध्ये त्याचा रिपोर्ट पोझिटीव्ह आला आहे. दरम्यान, मुख्याधिकारी यांनी खबरदारी म्हणून वडगाव शहरात तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. वडगावचा जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे.
पेठ वडगाव येथील लाटवडे रोड येथे एका महाविद्यालयाजवळ रहात असलेल्या ३७ वर्षीय इसमाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. ही व्यक्ती वडगाव येथे भाडेकरू म्हणून असून शिये येथे खडी क्रशरवर नोकरीस आहे.या इसमास त्रास होत असल्याने व कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याने स्वॅब दिला होता. यामध्ये हा इसम कोरोना पॉझिटीव्ह आला. याची माहिती सीपीआर प्रशासनाकडून मिळताच पालिका प्रशासनाने तत्काळ ही व्यक्ती रहात असलेल्या ठिकाणचा परिसर सील केला. हा इसम अन्यत्र कोठेही परगावी गेलो नसल्याचे सांगत असल्याने या व्यक्तीला कोठे संसर्ग झाला याची माहिती मिळत नाही. या इसमाची पत्नी, दोन मुले यांनाही स्वॅबसाठी पाठविण्यात आले असून त्यांनाही अलगीकरणासाठी पाठविण्यात आले आहे. तर त्यांचे अन्य नातेवाइकानाही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
वडगाव शहरात आत्तापर्यत चौथा कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या परिसरात नगरसेविका सावित्री घोटणे, उपनगराध्यक्ष शरद पाटील भेट देवून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या तर पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी हा परिसर निर्जंतुकीकरण केला. त्याचबरोबर खबरदारी म्हणून मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी वडगाव शहरात सोमवार दि. ६जुलै ते ८ जुलै शंभर टक्के तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सांगितले असून शहरात फक्त दुध व औषध दुकाने सुरु राहणार आहे. दुध दुकान सकाळी दहा वाजे पर्यंतच सुरु राहणार आहेत. जनावरांचा बाजारही बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.