पेठ वडगाव/प्रतिनिधी
तुझ्यावर तक्रार दाखल आहे. तुझ्या तक्रारीची एफआयआर प्रत देतो असे सांगून पंटरद्वारा तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव याच्यासह दोन पंटर यांचेवर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली.
याबाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, तुझ्यावर तक्रार दाखल आहे. तक्रारीची एफआयआर प्रत देतो असे सांगून वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागास संपर्क साधून लाच मागितली असल्याची तक्रार केली. या नुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. आज सकाळच्या सुमारास ही लाच चेतन गावडे (रा.कोरेगाव, ता.वाळवा, जि.सांगली) यास स्वीकारण्यास सांगितली असता त्याने ती लाच पेठ वडगाव येथील प्रितम दिपक ताटे (रा.पेठ वडगाव, ता.हातकणंगले) यास स्वीकारण्यास सांगितले. ही लाचेची रक्कम ताटे याने स्विकारली. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉ. शरद पोरे, पो.ना.सुनिल घोसाळकर, पो.कॉ.मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली. या कारवाईसाठी लाचलुचपत विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौंडा यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान या कारवाईमुळे वडगाव पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. सायंकाळी पो.कॉ.जाधव याच्या पोलीस क्वार्टर्स मधील घराची झडती लाचलुचपत विभागाकडून घेण्याचे काम सुरु होते. वडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.