पेठ वडगाव /प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबपवाडी रोडवर अज्ञात इसमाला बेदम मारहाण करून हातपाय बांधून टाकलेला मृतदेह आढळून आला. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह कोणाचा आहे याची माहिती घेत आहेत. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बेदम मारहाण करून खून करणार्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत.
या बाबत घटनास्थळावरून घेतलेली माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून काही अंतरावर अंबपवाडी रोडवर रस्त्याच्या कडेला अंदाजे पंचावन्न वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह बेदम मारहाण करून दोरीने बांधून टाकलेल्या अवस्थेत टाकलेला आढळून आला. या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे व अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता लाकडी काठीसारख्या वस्तूने पायावर बेदम मारहाण केल्याने अंग काळे-निळे पडल्याचे व दोरीने हातपाय बांधून या टाकल्याचे दिसून आले तर डोक्यालाही जखम झाल्याचे दिसून आले. हातपाय व डोक्यात बेदम मारहाण करून हा मृतदेह या ठिकाणी कोणीतरी आणून टाकला असण्याची शक्यता आहे. या वर्णनाच्या व्यक्तीचे ओळख पटविण्यासाठी व त्याचे नातेवाईकांचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत. तर मारहाण करून खून करणार्या आरोपींचा पोलीस शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली आहे.