पेठ वडगाव/प्रतिनिधी
संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणी व अन्य विविध मागण्यासाठी आज पेठ वडगाव परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मागणीसाठी वाठार– कोडोली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येवून शासनाकडे असलेल्या मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत निशाणदार यांचेकडे देण्यात आले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या बंदला व्यापारी– व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर वडगाव शहरात खाजगी व एस.टी.बस वाहतूक बंद होती. तर विविध मागण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये, बंद होती. यामुळे शहरात सगळीकडे शुकशुकाट होता. या बंदमुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
वाठार येथे शेतकरी संघटनेने वाठार–कोडोली रस्त्यावर रास्ता रोको करून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. शेतकर्याचा सातबारा करावा व अन्य विविध मागण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले. वडगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रशांत निशाणदार यांनी निवेदन स्वीकारले यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.
यावेळी आप्पासो येडके,सत्वशील जाधव, संपतराव पवार, हरिभाऊ जाधव, सुधीर मगदूम, महेश पांडव, शिवाजी आंबेकर, तानाजी मोरे, उमेश पाटील, आण्णा मगदूम, सदाशिव बोने–पाटील, सुरेश पाटील, शंकर पाटील, पिंटू पाटील, महावीर पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.