पेठ वडगाव / प्रतिनिधी
पेठ वडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची निवड निश्चित झाली आहे. या बाबत युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत चव्हाण याचे नाव निश्चित केले आहे. बुधवार दि.२८ रोजी ही निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष असलेले चव्हाण यांना ही संधी मिळत असल्याने मनसे कार्यकर्त्यासह वडगाव शहरातील नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.
पेठ वडगाव पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या धोरणानुसार पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर शरद पाटील यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. याबाबत युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी नगरसेवक संतोष चव्हाण यांचे नाव निश्चित केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचे नगरसेवक संतोष चव्हाण विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. वडगाव शहरात नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी यासाठी आंदोलने करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून जनतेशी नाळ जोडली आहे. तळागाळातील गोरगरीब जनतेची शासकीय कार्यालयामध्ये होत असलेली पिळवणूक, प्रलंबित ठेवली जात असलेल्या कामाबाबत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवून दिला आहे. प्रथमताच पालिकेच्या नगरसेवक पदासाठी उभे राहून त्यांनी विजय प्राप्त केला आहे.
तळागाळातील जनतेसाठी रस्त्यावरची लढाई करत असलेले मनसे शहराध्यक्ष व नगरसेवक संतोष चव्हाण यांना उपनगराध्यक्ष पदासाठी संधी मिळत असल्याने मनसे सैनिकासह शहरातील विविध स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.