पेठ वडगाव / संतोष सणगर
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव व परिसरातील नागरिकांना बँकेतून बोलतोय आपले एटीएम कार्ड अपडेट करायचे आहे. तुमचे एटीएम कार्ड अपडेट केले नाहीतर ते ब्लॉक होईल असे सांगून असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी सांगण्यास सांगून फसवणुकीचे मोबाईल कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना अशी माहिती कोणासही न देण्याबाबत सावध करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर सायबर क्राईम विभागाने व्यापक अभियान राबवून नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे.
सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात बहुतांशी सगळ्यांकडे मोबाइल आला आहे. याच मोबाइलच्या माध्यामातून अनेकजणांचे पेठ वडगाव व परिसरात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. विविध माध्यमातून पोलीस व सायबर क्राइम विभाग नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना करत आहे. मात्र नागरिक या फसवणुकीला बळी पडत आहेत. यामध्ये बँकेतून बोलत आहे आपले एटीएमची मुदत संपत असून अपडेट करायचे असे मोबाइलवर सांगून बँक ग्राहकाकडून ओटीपी व अन्य माहिती घेवून बँक खात्यावरील तसेच क्रेडीट कार्डच्या रक्कमेवर डल्ला मारला जात आहे.
याचबरोबर कमी किंमतीत वाहने देण्याचे खोटे मेसेज पाठवून फसवणुकीचेही प्रकार घडत आहेत. आपल्याला कर्ज रक्कम मंजूर झाली आहे आपल्या खात्याची माहिती द्या असे मेसेज येत आहेत. यामध्ये अनेकांची फसवणूक होत आहे. अनेकांना असे फसवे मेसेज येत असल्याने बँक प्रशासनाकडून ग्राहकाच्या खात्याची गोपनीय माहिती बाहेर कशी जाते असा प्रश्न आता बँक grahkग्राहकासमोर असून बँक खात्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बँक ग्राहक अनवधानाने या फसवणुकीला बळी पडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. तर अनेकजण याबाबत दक्ष राहून माहिती देण्याची टाळत आहेत मात्र असे कॉल आल्यामुळे बँक खात्यातील रक्कमेबाबत असुरक्षितता अनुभवत आहेत.
जिल्हा सायबर क्राइम विभागाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने
विशेष जनजागृती अभियान राबविण्याची मागणी
जिल्हा पोलीस विभागाने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या सायबर क्राइम विभागाने याबाबत विविध पोलीस ठाण्यांतर्गत सायबर क्राइम विभागाने विशेष जनजागृती अभियान राबवून नागरीकात जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासाठी बँक, शाळा, महाविद्यालये यांनी सहकार्य करून व्यापक जनजागृतीस हातभार लावण्यास अनेक बँक ग्राहकमध्ये व्यापक जागृती करून सायबर फसवणुकीपासून बचावास मोठी मदत होवू शकते. यासाठी जिल्हापोलीस प्रमुख यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे.