प्रतिनिधी / पेठ वडगाव
लडाखमधील गलवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानावर केलेल्या क्रूर हल्ल्यात देशभरातून निषेध करण्यात येत आहे. चीनच्या या कृत्याचा निषेध नोंदवत व वडगाव शहर परिसरातील नागरिकांनी चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत वडगाव शहर शिवसेनेच्यावतीने चीनच्या राष्ट्राध्यक्ष यांची प्रतिमा असलेला चीनचा ध्वज जाळून तीव्र निषेध करण्यात आला.
चीनने दगाबाजी करून भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्यामुळे भारताचे जवान शहीद झाले. यामुळे देशभरातून चीनचा देशभरातून तीव्रप्रकारे निषेध करण्यात येत आहे. वडगाव शहर शिवसेनेच्यावतीनेही चीनने केलेल्या कृतीचा निषेध करण्यात आला. या निषेधावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्ष यांची प्रतिमा असलेला चीनचा ध्वज जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अंकुश माने, सुनिल माने, जय कराडे यांनी मनोगत व्यक्त करून दगाबाज चीनच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी वडगाव शहरातील नागरिकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी चीनी वस्तू न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिक व नागरिकांनी चीनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेना वडगाव उपशहर प्रमुख अंकुश माने यांचेसह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते