स्थानिकानाच नोकऱया मिळाव्या अन्यथा रस्त्यावर येऊः उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघातील जे होऊ घातलेले प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. या प्रकल्पावरून आपल्यावर वेळप्रसंगी आरोप, टीका सहन करून प्रकल्प आणले. आता त्या प्रकल्पातून स्थानिकानाच रोजगार मिळवण्यासाठी पुढील पाच वर्षे निवडून आणण्याची संधी द्यावी. स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास मी स्वतः जनतेसोबत रस्त्यावर उतरणार आहे, अशा इशारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पोरस्कडे येथे दिला.
पोरस्कडे पेडणे येथील पंचायत क्षेत्रातील सर्व अंतर्गत रस्त्याचे हॉटमिस, डांबरीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खाजने – अमरे -पोरस्कडे पंचायतीच्या सरपंच ग्लेन्सी परेरा, अमोल सावळ, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, मधू पेडणेकर, प्रँकी परेरा, रॉष फर्नांडिस, नीता मावळणकार, राजेश मुळगावकर, अनिल कुडव, फिलीप फर्नांडिस, अभियंता लक्ष्मण नाईक, आदी उपस्थित होते. प्रकल्पाच्या रूपाने जी झाडे लावली, त्या झाडांना लागलेली फळे आता आमच्या मुलांना रोजगाराच्या रूपाने मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन काम करूया, असे बाबू आजगावकर यांनी आवाहन केले.
नोकऱया आपल्याच मतदारसंघ देऊ शकतो
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दावा करताना केवळ पेडणे मतदार संघातीलच प्रकल्पातून नोकऱया उपलब्ध होणार आहेत. मोपा विमानतळ 2500, आयुष्य हॉस्पिटल 1500, क्रिकेट स्टेडियम 1000 अशा नोकऱया उपलब्ध होणार आहे. या नोकऱया स्थानिकांनाच मिळायला हव्यात, त्यासाठी आपण मतदारासोबत आहे असे आजगावकर म्हणाले.
कोरोना काळात पोरस्कडे पंचायत क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली नाही त्याबद्दल खंत व्यक्त करताना यापुढे या क्षेत्राला विकास आणि रोजगाराच संधी मिळवून देण्याची ग्वाही दिली.
सरपंच ग्लेन्सी परेरा यांनी बोलताना मागच्या 10 वर्षांपूर्वी बाबू आजगावकर यांनीच या रस्त्याचे हॉटमिक्स केले होते. त्यानंतर निवडून आलेल्या आमदाराने लक्ष दिले नाही आता परत एकदा आजगावकर यांच्या सहकार्यातून रस्त्याचे हॉटमिक्स होत असल्याने समाधान व्यक्त केले. याही पुढे या मतदारसंघातून बाबू आजगावकर यांना विजयी करण्यासाठी जास्तीतजास्त मते देणार, असे सांगितले.
जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर यांनी बोलताना बाबू आजगावकर हे विकासासाठी कुठेच कमी पडले नाही. आता नोकऱया उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा जनतेने त्यांना निवडून आणावे, असे आवाहन केले.