क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
डिचोलीतील व्हिजुअल लिंक क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या दिवशी बार्देश इलेव्हन आणि पेडणे वुमन्स संघाने विजय मिळविले. पहिल्या लढतीत बार्देश इलेव्हन संघाने साखळी इलेव्हनचा 74 धावानी पराभव केला तर दुसऱया लढतीत पेडणे वुमन्सने वाळपई वुमन्सला 76 धावानी पराभूत केले.
मये मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवा क्रिकेट संघटनेचे खजिनदार परेश फडते तसेच स्पर्धेचे समन्वयक विजय खोलमकर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलकः बार्देश इलेव्हन, 1 बाद 177 (पूर्वजा वेर्लेकर 76, मृण्मयी भिके 49, उर्वशी गोवेकर 8 धावा. डिंपल गावकर 1 बळी) विजयी विरूद्ध साखळी इलेव्हन, सर्वबाद 103 (सेजल सातार्डेकर 37, अविशा कळंगूटकर 21, अश्विनी आमोणकर 19 धावा. सिद्धी सवासे 5, तनया नाईक 2 बळी). वुमन ऑफ दी मॅच- पूर्वजा वेर्लेकर (बार्देश इलेव्हन).
पेडणे वुमन्स, 134 धावा (प्रज्ञा पेडणकर 17, काशी सावळ देसाई 11 धावा. तनुजा गावकर व स्वाती कोपार्डेकर प्रत्येकी 3 बळी) विजयी विरुद्ध वाळपई वुमन्स, सर्वबाद 58 (चैत्राली मेस्त्री 11 धावा. प्रज्ञा पेडणेकर 3, पूर्वा भाईडकर 2 बळी). वुमन ऑफ दी मॅच- प्रज्ञा पेडणेकर (पेडणे वुमन्स).