स्थानिक महिलांना नगरसेवक महेश आमोणकर यांचे आश्वासन : सरकार, आमदार दिगंबर कामत यांनी खोटे आश्वासन दिल्याचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
रविवारी रात्री माझ्या प्रभागातील पेड-खारेबांदमधील बहुतेक महिला रहिवाशांनी माझ्याकडे सुलभ शौचालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. कारण सरकार आणि आमदार दिगंबर कामत यांनी त्यांना हे सुलभ शौचालय सहा महिन्यांपूर्वी दुरुस्त करण्याचे खोटे आश्वासन दिले, असा दावा प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केला आहे.
येथील दोनपैकी फक्त एकाच शौचालयाची दुरुस्ती केली गेली आणि हे एकच शौचालय स्त्रिया आणि पुरुष दोघेही वापरतात, जे महिलांसाठी सोयीस्कर नसल्याचे आपल्या नजरेस आणून दिले गेले आहे, असे नगरसेवक आमोणकर यांनी सांगितले. अजून एक शौचालय नादुरुस्त स्थितीत असून ते दुरुस्त करायला मला सांगण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी मी या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला असता आमदार कामत तेथे आले आणि त्यांनी या शौचालयाची पाहणी करून मला सांगितले की, स्वतःच्या खिशातून हे शौचालय दुरुस्त करू नका. या शौचालयाचे दुरुस्तीकाम एका सुलभ कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, याकडे आमोणकर यांनी लक्ष वेधले.
परंतु एक शौचालय सोडल्यास दुसऱया शौचालयाच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असल्याने या सहा महिन्यांत येथील महिलांची कुचंबणा होऊन त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे आजपासून मी या सुलभ शौचालयाच्या पूर्ण दुरुस्तीचे काम स्वखर्चाने सुरू करणार आहे, असे आश्वासन नगरसेवक आमोणकर यांनी भेट घेण्यासाठी आलेल्या महिलांना दिले.