30 लाख द्या अन्यथा बॉम्बने उडवू
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील पेढय़ाचे व्यापारी प्रशांत मोदी यांना इंटरनॅशनल कॉलवरुन 30 लाख रुपये द्या अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवू अशी धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी सातारा पोलिसांना ईमेल केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांनी तक्रार दाखल केल्याचे कळल्यानंतर साताऱयातील एक हॉटेल व्यावसायिक व एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकासही अशा प्रकारे इंटरनॅशनल क्रमांकावरुन लाखो रुपये खंडणी मागून न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने हे नेमक काय शोधण्याचे आव्हान सातारा पोलिसांसमोर आहे.
प्रशांत मोदी यांना दीपावलीच्या शेवटच्या दिवसापासून नंतर सलग चार दिवस अशा प्रकारे रात्री, मध्यरात्री व दिवसा अशा प्रकारे इंटरनॅशनल कॉल येत होते व समोरील अनोळखी अफगाणी टाईफ हिंदीतून त्यांना ’30 लाख दो या बॉम्बसे उडा दे’ धमकी देत होता. त्यानंतर त्यांनी हिंदीतून मेसेज टाईप करुनही अशा प्रकारची धमकी दिली. प्लस 1 ने सुरु होणाऱया क्रमांकावरुन येणाऱया कॉलवरुन उर्दूमिश्रित किंवा सिमिलर भाषेतून असा धमकी देण्याचा सिलसिला सुरु होता.
याबाबत प्रशांत मोदी यांनी मग ईमेलद्वारे सातारा पोलिसांना तक्रार केल्यानंतर ती सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली. त्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे जाणवल्यानंतर पोलिसांनी प्रशांत मोदी यांना बोलावून घेवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी मोदी यांनी दिलेल्या स्क्रीन शॉट वरील मोबाईल क्रमाकांचा तपास सुरु केला असून यातून पुढे काय निष्पन्न होणार याकडे सातारकरांचे डोळे लागले आहेत.
या प्रकाराने प्रशांत मोदी घाबरलेले नाहीत. मात्र, त्यांनी पोलिसांना हा प्रकार माहिती असावा म्हणून तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी देखील साताऱयातील एका महिला डॉक्टरला अशा प्रकारे धमकीचे मेसेस इंटरनॅशनल फोन क्रमांकावरुन आले होते. त्यानंतर आता हा प्रकार समोर आल्यावर त्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले. त्यावर प्रशांत मोदी यांना साताऱयातील आणखी दोघांनी त्यांच्याबाबतही असा प्रकार घडला असल्याचे सांगितले.
यामध्ये एका हॉटेल व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास अनुक्रमे 15 लाख व 30 लाख रुपये खंडणी मागितली असून न दिल्यास ज्या प्रकारे मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली तशीच त्यांनाही देण्यात आलेली आहे. मोदी यांनी त्यांना पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन केले असून आणखी कोणास अशा प्रकारे धमक्या येत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन तक्रारी दाखल कराव्यात व घाबरुन जावू नये, असेही केले आहे.
मोदींचा सातारी झटका
प्रशांत मोदी हे पेढे व्यावसायिक असले तरी ते सामाजिक प्रश्नावर ते सोशल मिडियावर सातत्याने व्यक्त होत असतात. अनेक प्रश्न मांडून ते साताऱयावर भाष्यही करत असतात. त्यांना अशा प्रकारे फोन आल्यावर ते बिलकूल घाबरलेले नव्हते. त्यांनी फोन करणाऱयांना सातारी भाषेचा दणकाही दिला आहे. धमक्या देणाऱयांना त्यांनी नोटा कशा पाहिजेत ते तरी सांग, कान हाणू का रे गाबडय़ा असेही सुनावले आहे. या घटनेचे वर्णन त्यांनी नेहमीप्रमाणे सोशल मिडियावर केले असून फोन करणारांना सातारी दणका दिल्याच्या त्यांच्या कृतीचे नेटकऱयांनी अभिनंदनही केले आहे.