प्रतिनिधी / पर्वरी
पेन्ह द फ्रान्स पंचायतीने प्रभाग 11 मधील अतिक्रमणावर कारवाई केली. या धडक कारवाईत प्रभागातील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकामे होत असल्याच्या तक्रारी पंचायत कार्यालयात करण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पंचायतीचा परवाना न घेता अनेक बिगरगोमंतकीय व्यवसाय करतात. हे प्रकार वाढत असल्याने काल शनिवारी सरपंच स्वप्निल चोडणकर यांनी कामगारांच्या मदतीने प्रभाग 11 मधील अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीतील दोन बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. प्रभागात झोपडपट्टीत धार्मिक बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामावरून धार्मिक सलोखा बिघडू नये म्हणून ही कारवाई करून बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. पंचायत क्षेत्रात कवळेकर सुपर मार्केट परिसरात बिगरगोमंतकीय सामाजिक सुरक्षा अंतर न पाळता मासे तसेच फळांची विक्री करतात त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा सरपंच चोडणकर यांनी यावेळी दिला. यावेळी पंचसदस्य शालू गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते अमीर साखळकर व स्थानिक रहिवासी उपस्थिती होते.