लंडन / वृत्तसंस्था
मँचेस्टर सिटीचे मुख्य प्रशिक्षक पेप गार्डिओला यांना प्रीमियर लीग स्पर्धेतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम मॅनेजर पुरस्कार जाहीर करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग स्पर्धेतील आपले तिन्ही सामने जिंकले. गार्डिओला यांनी महिन्यातील सर्वोत्तम मॅनेजर पुरस्कार जिंकण्याची ही वर्षातील दहावी वेळ आहे. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकण्याच्या निकषावर गार्डिओला यांनी वेस्ट हॅमचे मॅनेजर डेव्हिड मोएस यांच्या विक्रमाशी यावेळी बरोबरी केली.
सर ऍलेक्स फर्ग्युसन यांनी 27 वेळा तर अर्सेने वेंगरनी 15 वेळा हा पुरस्कार संपादन केला आहे. नोव्हेंबरमध्ये मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडविरुद्ध डर्बी लढतीत 2-0 असा विजय संपादन केला आणि त्यानंतर इव्हर्टनचा 3-0 असा फडशा पाडला. पुढे इतिहाद स्टेडियमवर त्यांनी वेस्ट हॅम युनायटेडला 2-1 अशा फरकाने नमवत विजयी घोडदौड कायम राखली.
गार्डिओला यांना पुरस्कार लाभणे ही या विजयी घोडदौडीची पोचपावती ठरते आहे. 50 वर्षीय गार्डिओला यांना फुटबॉल तज्ञांच्या पॅनेलने बहुमत दिले. स्टीव्हन गेरार्ड व जर्गेन क्लूप हे गार्डिओला यांच्या शर्यतीत होते.
लिव्हरपूलचा ट्रेंट अलेक्झांडर सर्वोत्तम खेळाडू
लिव्हरपूल एफसीचा ट्रेंट अलेक्झांडर ऍरनॉल्ड नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम प्रीमियर लीग फुटबॉलपटू ठरला. लिव्हरपूलतर्फे राईट बॅकवर खेळणाऱया ट्रेंटने एक गोल केला, 4 असिस्ट केले व 2 क्लीन शीट नोंदवले. वेस्ट हॅम युनायटेडविरुद्ध 3-2 पराभवात त्याची दमदार फ्री कीक व असिस्ट केंद्रस्थानी राहिले.
नंतर ऍनफिल्ड येथे अर्सेनलविरुद्ध 4-0 विजयात त्याने दोन असिस्ट व एका क्लीन शीटचे योगदान दिले. डिसेंबर 2019 नंतर त्याने हा महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त करण्याची पहिलीच वेळ आहे. यंदा पुरस्कार जिंकल्याने लिव्हरपूलच्या एखाद्या खेळाडूने वरचष्मा गाजवण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑक्टोबरमधील सर्वोत्तम प्रीमियर फुटबॉलपटूचा पुरस्कार लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने पटकावला होता.