दक्षिण अमेरिका खंड अद्याप कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू राहिला आहे. या खंडात ब्राझीलनंतर सर्वाधिक रुग्ण पेरूमध्ये आढळले आहेत. पेरूमधील रुग्णांची संख्या आता इटलीपेक्षाही अधिक झाली आहे. पेरूमध्ये 2,40,908 रुग्ण आढळले आहेत. तर इटलीत 2,37,828 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या अधिक असल्याने देशातील आरोग्य व्यवस्था आता अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे.
अमेरिकेत पुन्हा टाळेबंदी नाही
अमेरिकेत पुन्हा टाळेबंदी लागू करणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. काही प्रांतांमध्ये रुग्ण वाढले आहेत. अर्थव्यवस्था खुली करणे आणि देशात सुरू असलेली निदर्शने यासाठी कारणीभूत असू शकतात. अमेरिकेत दिवसभरात 809 जणांचा मृत्यू झाला असून 26 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या न्यूयॉर्कमध्ये 16 जून रोजी 17 जणांचा मृत्यू झाला, हा आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा ठरला आहे.