जगभरात आतापर्यंत 73,43,807 कोरोनाबाधित : महामारीमुळे 4 लाख 14 हजार 129 जणांचा ओढवला मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 4 लाख 14 हजार 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांचे प्रमाण 73,43,807 वर पोहोचले आहे. या संसर्गावर मात करणाऱयांची संख्या आता 36,21,424 झाली आहे. ब्राझील सरकारने 4 जूननंतर पहिल्यांदाच शासकीय संकेतस्थळावर कोरोना संसर्गाशी संबंधित अद्ययावत माहिती मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप केला होता. याचबरोबर अनेक संघटनांनी सरकारवर बाधितांचे आकडे लपविल्याचा आरोप केला होता. ब्राझीलमध्ये दिवसभरात 32 हजार नवे बाधित आढळून आले आहेत.
पेरूमध्ये संकट
पेरूमध्ये आता कोरोनाबाधितांचे एकूण प्रमाण 2,03,736 वर पोहोचले आहे. मागील 24 तासांमध्ये 167 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आता मृतांचा आकडा 5,738 झाला आहे. अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत संसर्ग अत्यंत वेगाने फैलावलेला आहे. ब्राझील, पेरू आणि मेक्सिकोमध्ये रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत.
मेक्सिको : संकट वाढणार
मेक्सिकोत अद्याप कोरोना विषाणू संकट टोकाला पोहोचलेले नसल्याचे उद्गार आरोग्य उपमंत्री ह्यूगो लोपेझ-गॅटेल यांनी म्हटले आहे. संकट टोकाला पोहोचण्यास अनेक आठवडे लागणार असल्याचे सांगत त्यांनी देशवासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ब्राझीलमध्ये दिवसभरात सुमारे 3 हजार नवे बाधित सापडले आहेत.
मेक्सिकोत आतापर्यंत 1,24,301 बाधित सापडले आहेत. तर 14,649 जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
ब्राझील : चिंताजनक स्थिती
ब्राझीलसाठी बुधवारचा दिवस अत्यंत चिंताजनक राहिला आहे. देशात एकूण 32 हजार 91 नवे बाधित सापडले आहेत. देशात आतापर्यंत 7,42,084 रुग्ण आढळले आहेत. सलग चौथ्या दिवशी देशात एका दिवसात 30 हजारपेक्षा अधिक बाधित सापडले आहेत. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 38,497 जणांचा बळी गेला आहे. अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्या विरोधात आता देशात आवाज उठू लागला आहे. तर महामारीमुळे देश बंद करता येणार नसल्याचे बोल्सोनारो यांचे म्हणणे आहे.
पाक : डब्ल्यूएचओचा दबाव
जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तान सरकारला पुन्हा टाळेबंदी लागू करत त्याचे कठोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. मागील महिन्यात पाकिस्तानात आंशिक स्वरुपात टाळेबंदी लागू करण्यात आली होती, परंतु त्याचा प्रभाव कुठेच दिसून आला नव्हता. रमजानदरम्यान मशिदी खुल्या राहिल्या आणि ईददरम्यान बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 1,13,702 बाधित सापडले असून 2,255 जणांचा मृत्यू झाला आहे.
महामारी संपलेली नाही
अमेरिकेचे साथरोगतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी कोरोना महामारी अद्याप संपुष्टात आलेली नसल्याचा इशारा दिला आहे. कोरोना विषाणू सर्वात मोठे दुस्वप्न ठरले आहे. या विषाणूने 4 महिन्यात पूर्ण जगाला हलवून सोडले आहे. या महामारीमुळे अत्यंत कमी कालावधीत लाखो लोक बाधित झाले आहेत. आजारी लोकांनी जगभरात प्रवास केल्याने हा संसर्ग फैलावला आहे. लवकरच यावरील लस तयार होईल, अशी अपेक्षा असल्याचे फॉसी म्हणाले.
द. कोरियात संसर्गाला वेग
दक्षिण कोरियात कोरोना संसर्ग पुन्हा गतिमान होऊ लागला आहे. देशात 50 नवे बाधित सापडले आहेत. नाइटक्लब, जिमच्या ग्राहकांच्या स्मार्टफोनचा क्यूआर कोड नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गरज भासल्यास या व्यक्तींना शोधण्यासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. दक्षिण कोरियातील बाधितांचा आकडा 11,902 झाला असून 256 जणांना जीव गमवावा लागला आहे.
चीन : 3 नवे रुग्ण
चीनमध्ये बुधवारी तीन नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार हे तिन्ही बाधित विदेशातून दाखल झालेले आहेत. दुसऱया देशांमधून आलेल्या एकूण 1,786 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील 54 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरितांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे.
व्हिएतनाममध्ये नवा रुग्ण नाही
व्हिएतनाम या देशात कोविड-19 संसर्गाचा नवा रुग्ण आढळून आलेला नाही. देशात आतापर्यंत एकूण 332 बाधित आढळले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर यातील 317 रुग्णांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. व्हिएतनाम येथे मागील 54 दिवसांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. तर देशात सुमारे 9,100 जण विलगीकरणात आहेत. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.