गर्भवती महिलेसोबत गावी आलेला पतीचा मामा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह : ओटवणेत सतर्कता : संपर्कातील लोकांची आरोग्य विभागाने घेतली माहिती
प्रतिनिधी / सावंतवाडी:
भुदरगड-आकुर्डी (जि. कोल्हापूर) येथे क्वारंटाईन केलेल्या 54 वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यामुळे सावंतवाडीत टेन्शन वाढले आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासन कामाला लागले आहे. सदर व्यक्ती आपल्या भाच्याच्या गर्भवती पत्नीला सोडण्यासाठी कारने अंधेरी-मुंबई येथून ओटवणे येथे 16 एप्रिलला आली होती. त्यामुळे भुदरगडचे ‘कोरोना’ कनेक्शन ओटवणेशी जोडले गेले आहे.
दरम्यान, सदर महिलेला ओरोस येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याने आणि तिचा ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने नि:श्वास सोडला. परंतु ही महिला जेथे आली होती, त्या घरातील चौघांना क्वारंटाईन राहण्यास पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. तसेच आरोग्य विभागानेही गावात त्यांच्या संपर्कात आलेल्याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
‘होम क्वारंटाईन’साठी होता दबाव
महिला गावात आल्यानंतर तिला घरातच ‘क्वारंटाईन’ करून ठेवण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यावर काहीजणांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्याने आणि तहसीलदार म्हात्रे यांनी तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याने तिला प्रथम सावंतवाडीत आणि नंतर ओरोस येथे क्वारंटाईन करण्यात आले.
संबंधितांचे स्वॅब पाठविणार
या महिलेची आई ओरोसला तिच्यासोबत आहे. तर घरात तिघेजण आहेत. या सर्वांचे ‘स्वॅब’ घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून ओsटवणेतील त्यांच्या शेजारील ‘कोरोना’ची लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत तपासणी सुरू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली.
ई पास घेऊन आली होती गावी
मूळची चंदगड येथील असलेली ही महिला पतीसह अंधेरी मुंबईला राहत होती. तिचे माहेर ओटवणे येथे आहे. गरोदर असल्याने ती ई पासच्या माध्यमातून ओटवणे येथे पती, त्याचा मामा व चालकासह कारने आली होती. ओटवणेत आल्यानंतर ग्रामस्थांनी मुंबईतून आल्याने तिला घरी ठेवण्यास विरोध केला. तहसीलदार म्हात्रे यांना कळविण्यात आले. त्यांनी तिला सावंतवाडीत क्वारंटाईन करून ठेवले. त्यानंतर तिला ओरोसला हलविण्यात आले. तेथे ती प्रसुत झाली.
आकुर्डीत उतरलेला पतीचा मामा पॉझिटिव्ह
दरम्यान, तिचा पती व चालकाने सदर 54 वर्षीय व्यक्तीला परतीच्या प्रवासात वाटेत भुदरगड-आकुर्डी येथे सोडले. आणि तेथून ते मुंबईला गेले. परंतु आकुर्डीत उतरलेल्या मामाला कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंदात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. त्याला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्याने कोल्हापूर सीपीआरला पाठविण्यात आले. तेथून त्याचे स्वॅब मिरजला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले. त्याच्या संपर्कात कोण आले, याची चौकशी सुरू झाली. त्यातून या महिलेची माहिती मिळाली. ही माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभाग ओटवणेत दाखल झाले.
महिलेचे कुटुंब क्वारंटाईन
सदर महिलेच्या घरातील वडील, दोन भाऊ अशा तिघांना आणि ओरोस येथे असलेल्या आईला क्वारंटाईन राहण्यास प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर घराशेजारील संशयितांची तपासणी आरोग्य विभाग करणार आहे. त्याचा अहवाल काय येतो, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.
मुंबई-पुणे तसेच परगावातून येणाऱयांबाबत ग्रामस्थ जागृत आहेत. त्यांच्या जागरुकतेमुळे गाव कोरोनापासून सुरक्षित असल्याचे दिसत आहे. महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. परंतु आता नव्या अहवालाची प्रतीक्षा राहणार आहे.
चालक कस्टममध्ये नोकरीस
आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत ओटवणेत महिला, तिचा पती, पतीचा मामा, चालक आले होते. पती व चालक मुंबईला राहतात. या दोघांशी आरोग्य विभागाने संपर्क साधून त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगितले. चालक हा मुंबईत कस्टम विभागात नोकरीला आहे. तो स्वत:हून कोरोना टेस्ट करायला जोगेश्वरी येथील रुग्णालयात गेला होता. परंतु 14 दिवस झाल्याने त्याची टेस्ट करण्यात आली नाही. परंतु आरोग्य विभागाने आता त्यांना टेस्ट करण्यात सांगितले आहे. U