ऑनलाईन टीम / जळगाव :
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना जळगावात घडली आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी चुलत भाच्याने एका मांत्रिकाच्या मदतीने मावशीला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जळगाव हादरले हादरले असून, याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या चुलत भाच्यासह मांत्रिकाला अटक केली आहे.
माया दिलीप फरसे (वय 51) असं मृत महिलेचं नाव असून, त्या जळगावातील शिवाजीनगरमध्ये राहत होत्या. अमोल दांडगे असे महिलेच्या चुलत भाच्याचे तर संतोष मुळीक असे मांत्रिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत माया फरसे या 15 डिसेंबरला सकाळी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानतंर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता, पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासातून अमोलने मांत्रिकोसोबत मावशीला घनदाट झाडीत नेऊन जिवंत जाळल्याची कबुली दिली. मावशीला जाळल्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह तापी नदी पात्रात पुरुन ठेवला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला असून, दोघांना अटक केली आहे. अधिक तपास जळगाव पोलीस करत आहेत.