प्रतिनिधी/ दापोली
पैसे न दिल्याच्या रागातून तिघा सख्ख्या भावांनी एका 23 वर्षीय तरूणावर ब्लेडने सपासप वार केले. दापोली एस.टी.बसस्थानकाजवळील गल्लीत दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकाराने सुसंस्कृत शांत समजल्या जाणाऱया दापोलीत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी काळकाईकोंड-भारतनगर येथील सैफअल्ली नासीर मुल्ला (21), साद नासीर मुल्ला (18), साकीब नासीर मुल्ला (20) या तिन्ही भावांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काळकाई कोंड येथील फाईज रखांगे हे ठाणे येथे नोकरीला असतात. सध्या 2 दिवसांच्या रजेवर ते गावी आले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ते खासगी कामासाठी एसटी बसस्थानकाजवळ असलेल्या गल्लीमधून जात होते. यावेळी सैफअल्ली नासीर मुल्ला, साद नासीर मुल्ला, साकीब नासीर मुल्ला हे तिघे सख्खे भाऊ त्यांना भेटले. त्यांनी रखांगे यांना अडवून त्यांच्याकडे पैसे मागू लागले. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. यामुळे संतापलेल्या सैफअल्ली मुल्लाने त्यांची मान पकडली व त्याच्यासोबत असलेल्या साद व साकीब यांनी त्यांचे दोन हात पकडले. यावेळी रखांगे यांनी त्या तिघांना विरोध केला असता सैफअल्ली मुल्लाने त्याच्याकडे असलेल्या ब्लेडने त्यांच्या मान, पोटावर, डाव्या बाजूस वार करून जबर जखमी केले. तसेच साद मुल्ला, साकीब मुल्ला यांनी हाताच्या ठोशानी मारून शिवीगाळ करत दमदाटी केली.
ब्लेडच्या वारामुळे फाईज रखांगे हे रक्ताच्या थारोळय़ात रस्त्यावर पडले. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. मात्र त्यांना सोडवायला गर्दीतील कोणीही पुढे आले नाही. सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र या गर्दीतील एकजण धावत पोलीस स्थानकासमोरील मकबुल दिनवारे यांच्या दुकानात आला व त्याने एकाला एसटी स्टॅन्डच्या मागे मारत आहेत, असे सांगितले. यानंतर तेथे उपस्थित असणारे अब्दुल रखांगे, मकबुल दिनवारे, बासीत काजी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व फाईज यांना तिघांच्या तावडीतून सोडवले. शिवाय तिघांनाही तेथेच धरून ठेवले व पोलीस स्थानकात मोबाईलवरून ही घटना कळवली. यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. फाईज रखांगे यांना अधिक उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलीस स्थानकात भादंवि 307, 323, 341, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ करत आहेत.
तिघांची कसून चौकशी होणार
फाईज यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे तीनही भाऊ हे यापूर्वी मुंब्रा येथे रहात होते. तेथून ते दापोलीत रहायला आले आहेत. त्यांनी या आधी मुंब्रा येथे व दापोलीत अन्य कोणाला पैशासाठी धमकी दिली आहे का, याची कसून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.