वार्ताहर/ कराड
कराड तालुक्यातील नामांकित पैलवान व राष्ट्रीय कोच अमोल साठे यांचे मलकापूर येथील बंद घर फोडून चोरटय़ांनी साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अकरा हजार रुपयांची रोख रक्कम असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले आहेत.
पै. अमोल साठे दत्तनगर मलकापूर येथे राहतात. गुरुवार 6 रोजी ते स्पर्धेनिमित्त दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही दिल्लीला गेल्याने घराला कुलूप लावले होते. मात्र रविवारी सकाळी त्यांचा मित्र घराकडे गेला असता त्याला अमोल साठे यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजाचे लॉक कटरने कापल्याचे दिसले. चोरटय़ांनी घरात प्रवेश करून तिजोरीचे लॉकही कटरने तोडून तिजोरीतील साडेचार तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख अकरा हजार रुपये लंपास केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे.