प्रतिनिधी / मडगाव
रत्नागिरी येथील एका युवकाला वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कंपनीत काम करण्यासाठी म्हणून गोव्यात आणले होते. या युवकाला कंपनीने विलगीकरणात ठेवले होते. त्यावेळी त्याची कोरोना संबंधित दोन वेळा चाचणी घेण्यात आली ती दोन्ही वेळा निगेटिव्ह निघाली.
दोन चाचण्या निगेटिव्ह निघाल्यानंतर एका खाजगी लॅबमध्ये त्याची तिसऱयांदा चाचणी घेण्यात आली. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला थेट मडगावच्या कोविड-19 हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. दोन वेळा निगेटिव्ह आणि तिसऱयावेळी पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा युवक गोंधळून गेला. कोविड हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास तो राजी नव्हता. आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचे तो सांगत होता. मात्र, खाजगी लॅबमध्ये तो पॉझिटिव्ह झाल्याने त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर चौथ्यादा चाचणी घेण्यात आली असता, तो पुन्हा निगेटिव्ह निघाला. त्यामुळे त्याला डिसचार्ज द्यावा लागला. या निगेटिव्ह-पॉझिटिव्ह गोंधळात या युवकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कोविड-19 मध्ये इतर रूग्णांच्या ठिकाणीच त्याला नेण्यात आल्याने, आत्ता तो पुन्हा पॉझिटिव्ह होण्याचा धोका निर्माण झाला आहे.