आणखी 12 पॉझिटिव्ह : पिंगुळीतील पाच रुग्णांचा समावेश : जिल्हय़ात कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 28
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोनाचा वेग मंदावल्याची चिन्हे दिसत असताना पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी कोरोना बाधित सहा रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आणखी कोरोना बाधित बारा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 178 वर पोहोचली आहे. तर सद्यस्थितीत कोरोना सक्रीय 28 रुग्ण आहेत. नव्याने आढळलेल्या बारा रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यातील पाच, वैभववाडी तालुक्यातील एक आणि कणकवली तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांत आढळलेल्या 18 रुग्णांमध्ये स्थानिक रुग्णांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील पाच, कणकवली तालुक्यातील कलमठ येथील दोन, सांगवे, नांदगाव, फोंडा आणि करंजे येथील प्रत्येकी एक, तर वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे एका रुग्णाचा समावेश आहे. मंगळवारी आणखी दोन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 145 झाली आहे. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये कोरोना सक्रीय रुग्ण 28 आहेत.
स्थानिक रुग्ण आढळल्याने खळबळ
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे मुंबई प्रवास करून आले होते. स्थानिक रुग्ण आढळले नव्हते. जे काही पाच-सहा रुग्ण जिल्हय़ातील आढळले होते, ते मुंबईहून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील होते. मात्र गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या 18 रुग्णांमध्ये स्थानिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. विशेषत: कणकवली तालुक्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये स्थानिक रुग्णांचा समावेश असून या रुग्णांच्या संपर्कात अजून किती रुग्ण आले, याचा शोध घेणे सुरू आहे.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 03277
अहवाल प्राप्त झालेले नमुने 03260
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00178
निगेटिव्ह आलेले नमुने 03082
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00017
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 00028
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 00001
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 00145
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 00004
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 00044
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 03661
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 20418
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 00067
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 18260
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 02091
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 107463