अकरा रुग्ण कागदोपत्री केले गायब
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना रुग्णांबाबत दिल्या जाणाऱया आकडेवारीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. सोमवारी देण्यात आलेल्या माहितीमध्ये तर अकरा रुग्ण गायब झाल्याचे दिसून आले.
कोरोनाचे संकट ओढवल्यापासून कोरोनाची माहिती रोजच्या रोज जिल्हा रुग्णालयाकडून माहिती कार्यालयामार्फत दिली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या माहितीमध्ये वारंवार विसंगती दिसून येत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाकडून अधिकृत अहवाल जाहीर होण्याअगोदरच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कोरोना रुग्णांची माहिती बाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत रविवारी दुपारी देण्यात ‘प्रेसनोट’मधील माहितीनुसार जिल्हय़ात आतापर्यंत 492 रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 501 झाली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा आणखी 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 516 झाली. परंतु सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये एकूण रुग्ण 505 एवढेच पॉझिटिव्ह दाखविले गेले. त्यामुळे 516 एकूण रुग्ण संख्या झाली असताना अकरा रुग्ण कमी दाखविले गेल्याचे उघड झाले.