कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज अवघ्या 24 तासाच्या आतच कोरोना निगेटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यापूर्वी मंगळवारी पीसीबीने तो पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले होते. पण, या घोषणेला 24 तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच त्याचा आणखी एक कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. आपण व आपले कुटुंबिय कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती हाफीजने ट्वीटरवर दिली आणि याच्या स्पष्टीकरणार्थ कोरोना निगेटिव्हचे अहवालही जोडले.
हाफीज, वहाब रियाझसह 10 पाकिस्तानी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घोषणा मंगळवारी केली गेली होती. पाकिस्तानचा संघ कसोटी व टी-20 मालिकेसाठी रविवारी इंग्लंडला रवाना होणे अपेक्षित आहे. उभय संघातील ही मालिका ऑगस्टमध्ये आयोजित केली गेली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू क्वारन्टाईन असतील आणि क्वारन्टाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सरावाला सुरुवात करतील, अशी रुपरेषा तूर्तास आखली गेली आहे.
‘पीसीबीच्या चाचणी अहवालानुसार आम्ही पॉझिटिव्ह होतो. पण, तरीही आणखी एकदा आजमावून पाहण्यासाठी मी माझ्या कुटुंबियांसह दुसरीकडेही चाचणी करवून घेतली. या चाचणीचा अहवाल आज आला असून त्यानुसार आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. हा अहवाल निगेटिव्ह आहे’, असे हाफीज ट्वीटरवर म्हणाला.
हाफीज व रियाझसह फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हस्नेन, मोहम्मद रिझवान, शदाब खान, हैदर अली, हॅरिस रौफ या 8 खेळाडूनांही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पीसीबीचे सीईओ वासिम खान यांनी दिली होती. या सर्व खेळाडूंमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती, असे मंडळाने त्यावेळी जाहीर केले. इंग्लंड दौऱयावर रवाना होण्यापूर्वी या सर्वांची पुन्हा चाचणी घेतली जाईल व त्याचे अहवाल आल्यानंतर अंतिम संघ निवडला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही पथकातील सर्व सदस्यांची आणखी एकदा कोरोना चाचणी होणार आहे.